या सगळ्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणापासून स्वत:ला दूर केलं आहे. या प्रकरणाशी आपला दुरान्वये कसलाही संबंध नाही, असं म्हटलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी मुलाच्या डोक्यावरचा हात काढल्याची चर्चा आहे. परिणामी पार्थ पवार सगळीकडून अडचणीत येताना दिसत आहेत.
advertisement
जमीन घोटाळ्यावर अजित पवार नक्की काय म्हणाले?
"तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत, कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही," असंही अजित पवारांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे".
मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी- अजित पवार
"मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी. त्यांचा तो अधिकार आहे. जर उद्या कोणत्याही बाबतीत कोणी तक्रार केली तर चौकशी करुन त्याची शहानिशा करणं, सत्यता पडताळणं आणि काय नक्की घडलं आहे हे पाहणं हे सरकारचं कामच आहे. मी दिवसभर येथे असल्याने त्याची माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन उद्या संध्याकाळी भेटेन. काय झालं, कसं झालं. कागदपत्रं कायदेशीर आहेत का? नियमात बसतात का? सगळ्यांची माहिती घेईन वस्तुस्थिती समोर मांडेन," असं अजित पवार म्हणाले आहेत.
"मी कानावर आल्यानंतर चुकीच्या गोष्टी करु नका सांगितलं होतं. पण स्टॅम्प ड्युटी आणि इतर गोष्टींची शहानिशा करतो. अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कोणत्याही व्यवहारात, टॅक्सच्या, सगळ्याच्या बाबतीत नियमानेच वागलं पाहिजे. सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणेच झालंच पाहिजे. कोणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये याच मताचा मी आहे," अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
नेमका घोटाळा काय आहे?
कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरुन पार्थ पवार आणि त्यांच्या माध्यमातून अजित पवारही अडचणी आले आहेत. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या 1 लाखाचं भाग भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये किंमत असलेली जमीन, अवघ्या 300 कोटींत खरेदी केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे ही जमीन खरेदी करताना 21 कोटींच्या मुद्रांक शुल्काची माफीही मिळालीय. मुळात जी जमीन अमेडियानं खरेदी केली, ती महार वतनाची असल्याचं समोर आलं आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. त्यामुळं अगदी सुरुवातीपासूनच या जमीन व्यवहारप्रकरणात नियमांची मोडतोड आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय.
