जमीन घोटाळ्यावर अजित पवार नक्की काय म्हणाले?
"तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत, कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही," असंही अजित पवारांनी सांगितलं.
advertisement
पुढे ते म्हणाले की, "मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम कऱणारा कार्यकर्ता आहे".
नेमका घोटाळा काय आहे?
कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरुन पार्थ पवार आणि त्यांच्या माध्यमातून अजित पवारही अडचणी आले आहेत. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या 1 लाखाचं भाग भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये किंमत असलेली जमीन, अवघ्या 300 कोटींत खरेदी केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे ही जमीन खरेदी करताना 21 कोटींच्या मुद्रांक शुल्काची माफीही मिळालीय. मुळात जी जमीन अमेडियानं खरेदी केली, ती महार वतनाची असल्याचं समोर आलं आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. त्यामुळं अगदी सुरुवातीपासूनच या जमीन व्यवहारप्रकरणात नियमांची मोडतोड आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय.
