Latur News : शशिकांत पाटील, प्रतिनिधी, लातूर : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण प्रचंड तापलं आहे.ओबीसीतून या समाजाला आरक्षण दिल्याचा जीआर काढल्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक आहेत.याच आरक्षणापाई मध्यंतरीच्या काळात अनेक जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडल्या होत्या.पण आता लातूरमध्ये आरक्षण आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. ज्या व्यक्तींनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या.त्याच्या खिश्यात आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या चिठ्ठ्याही सापडल्या होत्या. पण आता या आत्महत्या प्रकरणात खिशात चिठ्ठी टाकून बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.
advertisement
राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्येच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लातूर जिह्यातील दोन आत्महत्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणात आत्महत्येपुर्वी लिहलेल्या चिठ्ठ्या संबंधितांनी स्वत:हून लिहलेल्या नसून त्या इतर कोणी जाणून बूजून खिशात ठेवल्याचे तपासात उघड झालं आहे. या तीनही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांनी स्वतंत्रपणे गु्न्हे दाखल करून तपास सूरू केला आहे.
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी या गावात २६ ऑगस्ट २०२५ रोजी बळीराम श्रीपती मुळे या 36 वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची चिट्ठी त्याच्या खिशात संभाजी मुळे या सख्या चुलत भावाने ठेवली होती.
निलंगा तालुक्यातील दादगी या गावात शिवाजी वाल्मीक मेळे यांचा विजेच्या शेगडीला करंट लागून मृत्यू झाला होता. पण त्याच्या खिशात 'महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली' अशी चिठ्ठी सापडली. नंतर पोलीस तपासात ही चिठ्ठी माधव रामराव पिटले या व्यक्तीने लिहून ठेवली असल्याचे निष्पण झाले होते.
चाकूर तालुक्यातील हनुमंत वाडी येथील अनिल बळीराम राठोड या व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात 'बंजारा समाजाला आरक्षण मिळावं या कारणासाठी आत्महत्या केल्याचे'चिठ्ठीद्वारे भासविण्यात आले होते. ही चिठ्ठी नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड याने तानाजी जाधव याच्या सांगण्यावरून लिहिली होती.
याप्रकरणी आता ज्या आरोपी विरुद्ध अहमदपूर निलंगा आणि चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी शास्त्रोक्त पद्धतीने मयतांचे हस्ताक्षर नमुने घेऊन तपास केला. संशयितांचे नमुने सीआयडी कडे तपासासाठी पाठविण्यात आल्यानंतरच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले आहे