लातूर, 24 डिसेंबर : लातूर जिल्ह्यातल्या भादा पोलिसांनी कला केंद्रावर केलेल्या तमाशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेमध्ये हा राडा केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात भादा पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कला केंद्रात गेले आणि त्यांनी गोंधळ घातला.
advertisement
भादा पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी गणवेशामध्ये झोकांड्या देत कला केंद्रावर आले. कला केंद्राच्या परिसरात त्यांनी कार थांबवली. कार थांबवल्यानंतर दोघं खाली उतरले. यातल्या एकाने तिथे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना लाथ मारली आणि दोन्ही दुचाकी पाडल्या.
हे दोघे जण तिथे काही काळ थांबले होते, यानंतर ते पुन्हा गाडीत बसले आणि निघून गेले. कलाकेंद्रातल्या एका महिलेला रात्री 3 वाजता त्यांनी बाहेर भेटायला बोलावल्याचाही आरोप होत आहे. कलाकेंद्रात जाऊन गाड्यांचं नुकसान केल्यामुळे आणि महिलेला रात्री अपरात्री भेटायला बोलावल्यामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आता या पोलिसांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
