लातूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. निलंगा तालुक्यातील तसेच औसा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार सौ. अंजना सुनील चौधरी यांचे 24 जानेवारी रोजी अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
advertisement
24 जानेवारीला सायंकाळी अंजना सुनील चौधरी यांचं उदगीर येथून अपहरण झाल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्याकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनही दिले आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सत्ताधारी भाजप आमदारांच्या गुंडांकडून हे अपहरण करण्यात आले असून लोकशाही मार्गाने निवडणूक न लढता दहशतीचे राजकारण सुरू आहे. निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार सौ.अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड परिसरात मैत्रिणीच्या घरी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
कार्यक्रम संपल्यानंतर प्रचारासाठी जाण्याचे ठरले होते. मात्र त्याआधीच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून पळवून नेल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. स्थानिक काँग्रेस नेते रणजीत कोकणे, पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवाराचे कुटुंबीय यांनी शोध घेतला असता त्या सापडल्या नसल्याचा दावा ही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन अपहृत उमेदवाराचा तात्काळ शोध लावावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पात्र उमेदवार मिळणे आधीच अवघड असताना अशा प्रकारे उमेदवाराचे अपहरण करणे हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. सौ. अंजना चौधरी यांचे पतीही घरी आढळून न आल्याने त्यांचाही अपहरणात समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेमुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
