मानसिकदृष्ट्या पूर्णपणे 'फिट'
या घटनेतील आरोपी माता अश्विनी हिला पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी तिची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी तिला तब्बल 30 तास मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले होते. मात्र, वैद्यकीय चाचण्यांनंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे 'फिट' असल्याचा अहवाल समोर आला आहे. कोणत्याही मानसिक आजारामुळे नव्हे, तर केवळ रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाल्याने तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
रागाचा भस्मासुर संचारला अन्....
मूळचे हासेगाव येथील असलेले हे चौगुले कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी लातुरात आले होते. वडील विक्रम हे उसाच्या ट्रॅक्टरवर रात्रभर कष्ट करत होते, तर 19 जानेवारीच्या सकाळी घरात रागाचा भस्मासुर संचारला होता. अश्विनीने आपल्या दीड वर्षाच्या लेकीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 17 वार केले. इतकंच नाही तर या निष्ठूर मातेने चिमुरडीच्या तोंडातही चाकू खुपसले, ज्यामुळे त्या कोवळ्या जीवाचा जागीच तडफडून अंत झाला.
विक्रम जेव्हा घरी पोहोचले तेव्हा...
या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सर्वात भयंकर भाग म्हणजे अश्विनीचा 4 वर्षांचा मुलगा राजवीर याने हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले. आपल्या सख्ख्या लहान बहिणीला आई मारत असल्याचे पाहून त्या बालमनावर न भरून निघणारी जखम झाली आहे. विक्रम जेव्हा घरी पोहोचले तेव्हा घराचा उंबरठा रक्ताने माखलेला होता आणि काळजाचा तुकडा निर्जीव पडलेला होता. या घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा सुन्न झाला असून समाजात संतापाची लाट आहे.
