सुरेश बंडगर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात निलंगा तालुक्यातील कासारसिरसी पोलीस ठाण्यात हा अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बंडगर (रा. कासारसिरसी, ता. निलंगा) हे २१ जुलै रोजी पत्नी सविता बंडगर (वय ३९) यांच्यासह उमरगा बसस्थानकात गेले होते. ते दोघंही गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. तेवढ्यात लघुशंकेच्या बहाण्याने सविता बाथरुमच्या दिशेनं गेल्या आणि त्या परत आल्याच नाहीत. हा प्रकार घडल्यानंतर सुरेश यांनी उमरगा पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गावातील रोहित सूर्यवंशी यानेच आपल्या पत्नीचे अपहरण केल्याचा संशय सुरेश यांना होता. तसं त्यांनी तक्रारीत देखील म्हटलं होतं. महिनाभरानंतरही पत्नीचा शोध न लागल्याने संतप्त झालेल्या सुरेशने सूड घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
गुरुवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता सुरेशने रोहितचा १४ वर्षीय पुतण्या कृष्णा सूर्यवंशी याचे निलंगा येथील कासारसिरसी येथील करीबस्वेश्वर विद्यालयासमोरून पांढऱ्या रंगाच्या कारमधून अपहरण केले. या कृत्यासाठी त्याने आपली दोन मुले अभिषेक आणि अजय यांची मदत घेतली. या घटनेची माहिती मिळताच कृष्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. कासारसिरसी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.