रितेशचं रविंद्र चव्हाण यांना चोख प्रत्युत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल लातूरमध्ये केलेल्या वक्तव्याचे आजही पडसाद उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र तथा बॉलिवूड स्टार रितेश देशमुख यांनीही या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये रितेशने रविंद्र चव्हाण यांना चोख प्रत्युत्तर दिलंय.
advertisement
लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही
"दोन्ही हात जोडून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र!", असं रितेश देशमुख व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्यावर केलेली ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. रितेश यांचे जेष्ठ बंधू काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनीही काल या वक्तव्याचा निषेध केलाय.
महाराष्ट्राची ही संस्कृती नाही - अमित देशमुख
लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारणाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे, असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
लातूर म्हणजे विलासराव देशमुख
दरम्यान, लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर एक वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली. विलासराव देशमुख हे राज्याच्या राजकारणातील मोठे नेतृत्व होतं. लातूर म्हणजे विलासराव देशमुख असं समीकरण होतं. अशातच आता लातूरमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
