सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी गावात राहणाऱ्या जनार्दन डोंगरे यांनी 2016 मध्ये सुपर सोनार द्राक्षाची लागवड केली होती. द्राक्षाच्या दरात बाजारामध्ये चढ-उतार झाल्याने तसेच निसर्गाने साथ न दिल्याने जनार्दन डोंगरे यांना जवळपास 40 लाख रुपयांचा फटका बसला होता.
80 वर्षांपासून चव कायम! अमरावतीचे 'नानकरामजी दहीवडेवाले' का आहेत जगप्रसिद्ध? पाहा खास रिपोर्ट
advertisement
शेवटी त्यांनी द्राक्षाची बाग मोडून 3 एकरमध्ये कारल्याची लागवड केली. तीन वर्षांपासून डोंगरे हे कारले पीक घेत असून लागवडीसाठी 3 एकरमध्ये दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. तर तीन वर्षांमध्ये खर्च वजा करून जनार्दन यांना 16 लाख रुपयांपर्यंतचा नफा या कारल्या पिकातून मिळाला आहे. डोंगरे यांनी कारल्याची विक्री बाजारात न करता थेट शेताच्या बांधावरूनच करत आहेत यामुळे कारल्याला 40 ते 50 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. तर या कारल्याची विक्री ते बाजारात न करता हैदराबाद येथे थेट विक्री करत आहेत.
एकदा कारल्याची लागवड केल्यापासून 40 दिवसानंतर तोडणी सुरू झाली तर जवळपास सहा महिने त्याची तोडणी सुरू असते. कारल्याचे पिकावर रोग होऊ नये म्हणून जनार्दन यांनी तीन ते चार दिवसाला फवारणी केली आहे. कारल्याचे जरी बाजारात दर पडले तर पुन्हा चार ते पाच दिवसानंतर दर वाढतात यामुळे हे कारल्याचे पीक डोंगरे यांना फायदेशीर ठरले आहे. पहिल्या वर्षी खर्च वजा करून डोंगरे यांना 6 लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला होता.
दुसऱ्या वर्षी खर्च वजा करून 3 लाख रुपयांचा नफा झाला होता. तर यावर्षी कारल्याला चांगला दर मिळाल्याने खर्च वजा करून 7 लाखांचा नफा मिळाला आहे. अजून दोन महिने कारल्याची तोडणी सुरू राहणार असून त्यातून एक ते दोन लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती शेतकरी जनार्दन डोंगरे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके किंवा ठराविक न घेता शेतामध्ये नवनवीन पीक घेऊन प्रयोग करून शेती केल्यास अधिक नफा मिळेल, असा सल्ला शेतकरी जनार्दन डोंगरे यांनी दिला आहे.





