2 डिसेंबरला महाराष्ट्रामधल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे, तर या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. निवडणूक आयोगाने अजून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा केलेली नाही.
दुबार मतदारांवर आयोगाचा मोठा निर्णय
निवडणुका जाहीर व्हायच्या आधी राज्यातल्या विरोधी पक्षांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. तसंच निवडणूक यादांमधला घोळ निस्तरून दुबार मतदारांची नावं यादीतून काढा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांकडून होत असलेल्या दुबार मतदारांच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
दुबार मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाने नियम बनवला आहे, ज्यात मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल. तसंच ज्याचं नाव मतदार यादीमध्ये दोन वेळा आलं आहे, त्याच्या नावापुढे डबल स्टार लावला जाणार आहे. दुबार मतदारांची नोंद वेगळी असणार आहे. दुबार मतदारांसंदर्भात दक्षता घेतली असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
ज्या मतदारांसमोर डबल स्टार असेल, त्या मतदाराकडून डिक्लेरेशन घेतलं जाईल आणि एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. ज्यांच्या नावापुढे डबल स्टार असेल त्यांनी निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा. ज्यांची नावं एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये असेल त्यांची नावं हटवली जातील. 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान करता येईल. तसंच 7 नोव्हेंबरला मतदारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.
