बीड : लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक असताना महाराष्ट्रात महायुतीकडून तयारीला सुरूवात झाली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरात महायुतीच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते या मेळाव्याला उपस्थित आहेत.
बीडमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला भाजप खासदार प्रीतम मुंडे तसंच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये महायुतीच्या ताई खासदार होतील, असा विश्वास व्यक्त केला, पण कोणत्या ताई खासदार होणार हे मात्र धनंजय मुंडेंनी थेट सांगितलं नाही.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर बीडच्या राजकारणाबाबत चर्चा सुरू झाल्या. 2019 साली धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव केला. आता सत्ता समीकरण बदलल्यामुळे प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देऊन धनंजय मुंडे पुन्हा एकदा परळीतून विधानसभा लढवू शकतात, अशा चर्चा रंगल्या. आता धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या ताई खासदार होतील, असं सांगितलं खरं पण त्यांनी नेमक्या कोणत्या ताई याचा उल्लेख मात्र केला नाही.
'...तर सहन करणार नाही', महायुतीच्या मेळाव्यातून प्रीतम मुंडेंचा घरचा आहेर
काय म्हणाले धनंजय मुंडे?
'2024 ला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. बीड जिल्ह्यात महायुतीच्या ताई खासदार होतील. सर्व पक्षाचे लोक सहजासहजी एकत्र बसत नसतात, पण हे चित्र पाहायला मिळतंय, याचा आनंद वाटतोय. देशातील अभूतपूर्व विजयासाठी आपण एकत्र आलो आहोत, एकत्र येऊन लढाईसाठी पुढे जातोय. या सगळ्याला अनेक जणांना नजर लावायची असते, वैद्यनाथ चरणी माझी प्रार्थना आहे, नजर न लागो माझ्याच या बांधवाला,' असं धनंजय मुंडे म्हणाले.
'महायुतीला आज आशिर्वादाची गरज आहे, आज लीड बँक भाजप आहे. तिळगूळ घ्या गोड गोड बोला. विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वांनी गोड राहावं,' असं विधानही धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंच्या भाषणावेळी भाजप खासदार प्रीतम मुंडेंही व्यासपीठावर होत्या.
महायुतीच्या बीडमधल्या या मेळाव्यात सुरूवातीला वादही झाला. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाले, यानंतर काही वेळात बॅनरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो लावण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे प्रीतम मुंडे यांनी नाराजीही व्यक्त केली.