सातारा : देशभरात पहिल्या तीन टप्प्याचं मतदान झालं असून सोमवारी चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात काही हाय व्होल्टेज मतदारसंघासाठीचं मतदान पार पडलं, यात बारामती, सांगली, सातारा तसं माढ्यासारख्या मतदारसंघांचा समावेश होता. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन कडक सुरक्षेमध्ये ठेवण्यात आली आहेत, पण आता साताऱ्याची ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणहून मोठी बातमी समोर येत आहे.
advertisement
साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदमाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्याचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सिद्धीविनायक सिक्युरिटी सिस्टीम लिमिटेडचे ठेकेदार मनेश कुमार गणेश लाल सारडा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सातारा एमआयडीसीच्या डीएमओ गोडाऊनमध्ये ही ईव्हीएम मशीन ठेवलेली आहेत. त्याठिकाणी संरक्षणाकरता सीसीटीव्ही बसवले आहेत, गेटच्या बाहेर नागरिकांसाठी त्याचं प्रक्षेपण तसंच उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्याची लिंक दिली आहे, पण 10 मे पासून गोडाऊन परिसरामध्ये सीसीटीव्हीचं कव्हरेज बंद दिसत आहे, याबाबत योग्य दखल घेऊन संबंधितांना सूचना दिल्या आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
साताऱ्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना झाला. भाजपकडून उदयनराजे भोसले यांना तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती.
