रावेर, 13 सप्टेंबर : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागले आहेत. जळगावच्या रावेर लोकसभेच्या जागेवरून महाविकासआघाडीमध्येच बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जातेय, कारण मविआतील शरद पवारांच्या गटाकडून एकनाथ खडसे यांच्या संभाव्य उमेदवारीची शक्यता वर्तवली आहे आणि पक्षादेश आल्यास आपण ती जागा लढू असं सूतोवाच खडसेंनी देखील केलं आहे.
advertisement
दरम्यान भाजप खासदार रक्षा खडसेंनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ खडसे त्यांच्या पक्षाच्या धोरणानुसार काम करत असतील, तर मी माझ्या पक्षाच्या धोरणानुसार काम करेन, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
तर दुसरीकडे लोकसभेसाठी रावेर हा मतदारसंघ बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसकडेच असून आपण त्या जागेवर ठाम असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी आपल्या कन्या केतकी पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणांगणात उतरवण्याचा ठरवलं असून, त्यासाठी आत्तापासूनच कंबर कसलीय आणि जनसंपर्क वाढीवर भर दिलाय.
जळगावच्या रावेरमधून लोकसभेसाठी जर पवार गटाकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली गेल्यास आणि भाजपकडून विद्यमान खासदार रक्षा खडसेंनाच उमेदवारी दिली गेल्यास सून विरूद्ध सासरे अशी थेट लढत पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याने रावेर लोकसभेवरून आघाडीत बिघाडी होऊ शकते, त्यामुळे आता मविआत रावेर लोकसभेच्या जागेवरून खटका उडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
