नांदेड : लोकसभा निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक आहेत, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. महाविकासआघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 23 जागांची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट 23 जागा लढण्यावर ठाम असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत, तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही इंडिया आघाडीमध्ये यायची इच्छा बोलून दाखवली आहे, याचसोबत वंचितने 12 जागांची मागणी केली आहे.
advertisement
जागा वाटपाच्या या मागण्यांवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकासआघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. संजय राऊतांची इच्छा 23 जागांची तर आंबेडकरांची 12 जागांची इच्छा आहे, शरद पवार गटाची काही इच्छा असेल. याची गोळाबेरीज केली तर आकडा 48 च्या वर जाईल, पण निवडून येण्याची परिस्थिती कुणाची हेच समीकरण असणार, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले होते, यामध्ये अशोक चव्हाणांचाही समावेश होता. दिल्लीतल्या या बैठकीत केंद्रीय समितीने राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. कोणत्या जागा सोयीच्या आहेत, याबाबत चर्चा झाली. बाकीच्या पक्षांशी बोलणी अजून सुरू आहेत, त्यांची मतं जाणून घेऊन निर्णय होईल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
वंदे भारत नांदेडपासून का नाही?
दरम्यान जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू झाली, मात्र ही ट्रेन नांदेडपासून का नाही? नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद का नको? असा सवालही अशोक चव्हाणांनी विचारला आहे. राज्यातून गुजरातला जाण्यासाठी 54 विमानं आहेत, पण आपल्या राज्यातून आपल्याच राज्यात जाण्यासाठी फक्त 16 विमानं आहेत. हे नियोजन चुकीचं आहे. केंद्राचं मराठवाड्याकडे लक्ष नाही, असा आरोपही अशोक चव्हाणांनी केला आहे.