नेमकं काय घडलं?
सध्या माढ्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात, दुकानांत पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे. अशात दररोज मशिदीत झोपायला जाणारे अपंग सिकंदर सय्यद याच पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांचा सुरेश यांनी जीव वाचवला आहे.
advertisement
मध्यरात्री मशिदीत पाणी शिरलं
सिकंदर सय्यद हे नेहमीप्रमाणी काल मशिदीमधे झोपायला गेले. एवढा मोठा पूर येईल, याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता. पण ते मशिदीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली. अंगाखाली पाणी आल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांनी रांगत रांगत मशिदीचा दरवाजा उघडला. बाहेर आले. तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी असल्याचं त्यांना दिसलं. वेळ मध्यरात्रीची होती. त्यामुळे बाहेर पडणं अवघड होतं. त्यामुळे त्यांनी मशिदीत आसरा घेण्याचं ठरवलं.
पत्रा उचकटून वाचवला जीव
काही तास तसेच ते पाण्यात बसून राहिले. पण पाण्याची पातळी हळूहळू वाढत होते. पाणी अगदी त्यांच्या छातीपर्यंत येऊ लागले. पहाटेपर्यंत ते तग धरून बसले. पण पाणी गळ्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी ओरडायला सुरुवात केली. मशिदीतून ते पत्रा वाजवू लागले. तेव्हा बाजूच्या घरावरील काहीजणांना त्यांचा आवाज आला. त्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरेश शिंदे यांनी पोहत जाऊन सिकंदर सय्यद अडकलेली मशीद गाठली. ते मशिदीच्या पत्र्यावर चढले. पण पत्रे नट-बोल्टने फिट केले होते. त्यामुळे त्यांनी इतर युवकांकडून पक्कड मागवून घेतली. यानंतर नट काढून आणि पत्रे उचकटून सय्यद यांना ओढून बाहेर काढलं.