एकीकडे नगर परिषद आणि नगर पंचायतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसताना राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकीची तारीख समोर आली आहे. राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुका १५ डिसेंबर पासून लागणार आहे. सुरुवातीला 'क' आणि 'ड' वर्गातील मनपा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 'अ' आणि 'ब' वर्गातील महानगर पालिकेच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
त्याचबरोबर मुबंई, ठाणे आणि पुण्यासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुका एकत्रित होणार आहेत. यासाठी १५ डिसेंबर पासून राज्यात आंचार संहिता लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खरं तर, निवडणूक आयोगाकडून महानगर पालिकांच्या निवडणुका सगळ्यात शेवटी घेणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता नगर परिषद आणि नगर पंचायतीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यात महानगर पालिकांची निवडणूक लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच महत्त्वाच्या महानगर पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून सर्वस्वी प्रयत्न केले जातील.
यात मुंबई महानगर पालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक नेमकी कशी होणार? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
