रितेश देशमुखने आपल्या भाषणात म्हटले की, ज्याला लहानपणापासून फक्त धीरज म्हणायचो, त्याला आज तुमच्यामुळे धिरज भैय्या म्हणावं लागतंय. खरंच हे लय भारी आहे. हा जनसमुदाय म्हणजे वेड आहे आणि आजची सभा म्हणजे धीरज भैय्याच्या लीडची सभा आहे. ही गर्दी म्हणजे धीरज यांच्या कामाची पावती असून लातूरच्या स्वाभिमानाची सभा आहे. मागील निवडणुकीत मी आवाहन केल्यानंतर तुम्ही लाख मतांच्या लीडने त्यांना विजयी केले. धीरजच्या मनात लातूरच्या विकासासाठी तळमळ आहे. धीरजला लोकांचे कामे करायची आहेत, त्यांची अश्रु पुसायची आहेत. लोकांसाठी झटत असल्याचे रितेशने सांगितले.
advertisement
रितेश देशमुखने आपल्या भाषणात म्हटले की, आपल्या लातूर पॅटर्नमुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला, सुशिक्षित झाले. मात्र, या शिकलेल्या युवकांच्या हाती रोजगार आहे का, रोजगार देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे रितेशने सांगितले.
धर्माचं आम्ही पाहून घेतो, पण आमच्या कामाचं बोला...
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या भाषणात पुढे म्हटले की, आज सगळे पक्ष म्हणतात की धर्म धोक्यात आहे, धर्माला वाचवा. पण खरं तर ते धर्मालाच प्रार्थना करत आहेत की त्यांना या निवडणुकीत वाचवावे. धर्म प्रत्येकाला प्रिय आहे. धर्माचे आचरण प्रत्येक जण करतो. पण धर्माच्या नावाने बोलणाऱ्यांना विचारा आमच्या कामाचं काय झालं? धर्माचे आम्ही पाहून घेतो, तुम्ही आमच्या पिकांच्या भावाचे सांगा, धर्माचे आम्ही पाहून घेतो तुम्ही आमच्या आया-बहिणींच्या सुरक्षितेचे सांगा असे विचारा, असे आवाहन रितेशने आपल्या भाषणात केले. निवडणूक काळात बऱ्याचशा, भुलथापा येतील, अफवा येतील, गाफिल राहु नका असे आवाहनही रितेशने केले.
झापूक झुपूक वातावरण, गुलिगत धोका नको...
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या भाषणात म्हटले की, निवडणुकीचे वातावरण सध्या झापूक झुपूक आहे. गेल्यावेळी लाखांची लीड होती यावेळी एवढ्या जोरात बटन दाबा की विरोधकांचं पुढचं डिपॉझिट आजच जप्त झालं पाहिजे. समोरच्या उमेदवाराकडून गुलिगत धोका होईल. पण, आपण सजग असले पाहिजे असे रितेशने म्हटले. सर्वांनी मतदानासाठी आपल्या बुथवर काम करावे, मतदारांना आपली भूमिका समजावून सांगा असे आवाहन करताना निवडणुकीच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा भेटू असे त्याने म्हटले.
