राज्यातील बळीराजासाठी एकीकडे दिलासादायक तर दुसरीकडे काहीशी प्रतीक्षा करायला लावणारी मोठी बातमी समोर येत आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कर्जमाफीचे काम प्रगतीपथावर
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अत्यंत सकारात्मक असून सध्या त्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली असून, सध्या राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी आणि याद्या गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार कर्जमाफी देणार हे निश्चित असल्याचे सूचक संकेतही त्यांनी यावेळी दिले.
advertisement
अधिवेशनात घोषणा का नाही?
कर्जमाफीबाबत सरकारचे सकारात्मक संकेत असले तरी, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा तांत्रिक कारणांमुळे शक्य नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. "नियमानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात अशा प्रकारची घोषणा करण्यास काही तांत्रिक मर्यादा येतात, त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी जाहीर होणार नाही," असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत त्यांनी सकारात्मक भाष्य केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जरी अर्थसंकल्पात तरतूद दिसली नाही, तरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सरकार योग्य वेळी ही मोठी घोषणा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रत्यक्ष निर्णयासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
