भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी, नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर केली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार असल्याचे म्हटले. परंतु, मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ कोण घेणार, याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. विशेष म्हणजे भाजप आमदारांनी आपल्या गटनेत्याची निवड अद्यापही केली नाही. त्याआधीच भाजपकडून शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली. त्यावरून चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरीत ठेवत शपथविधी जाहीर करणे हे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढवण्यासाठीच रचलेली खेळी असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
एकनाथ शिंदेंना सूचक इशारा...
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद अथवा गृह, ऊर्जासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली असल्याचे वृत्त आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या बैठकीआधी स्वतंत्र भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर आपल्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणी केली. त्यासोबतच विधान परिषदेच्या सभापतीपदाची देखील बैठकीत शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. त्याशिवाय गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सूत्रांनी दिली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंतीही शिंदेनी अमित शाहांना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपने परस्पर शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करून एकनाथ शिंदेंना सूचक इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत आता एकनाथ शिंदेंच्या दबावात येणार नसल्याचा सूचक इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपकडून शिंदेंच्या मागणीला नकार...
तर, दुसरीकडे भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या मागणीवर फारसं सकारात्मक नसल्याचे म्हटले जात आहे. गृह खाते भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार आहे. यावर अजूनही तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे.
