एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही नेत्यांना आपआपल्या पक्षाचे गटनेते म्हणून जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या गटनेत्याची निवड 3 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर सुटणार असल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. त्यानंतर मागील एक-दोन दिवसात भाजपचे डोंबिवलीतील नवनिर्वाचित आमदार रविंद्र चव्हाण देखील दिल्लीत असल्याची चर्चा होती. चव्हाण यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याच्या वृत्ताने चर्चांना धुरळा उडाला. या चर्चेच्या दरम्यान रविंद्र चव्हाण यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
advertisement
रविंद्र चव्हाण यांनी काय म्हटले?
रविंद्र चव्हाण यांनी दिल्ली भेटीच्या सगळ्या चर्चांना फेटाळून लावले आहे. आपण मागील 2-3 दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघात असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण यांनी म्हटले की, सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
रविंद्र चव्हाण हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. महायुतीच्या येत्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. रविंद्र चव्हाण यांच्यावर निवडणूक काळात कोकणची जबाबदारी होती. कोकणात महायुतीला चांगलेच यश मिळाले. त्याची दखल घेत त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाची बातमी :
