शिवसेना आमदारांची तातडीची बैठक
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील राज्यात नवीन सरकारने कारभार हाती घेतला नाही. तर, दुसरीकडे सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात आला नाही. त्यामुळे नेमकं काय घडतंय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलवली. ही महत्वाची बैठक आज दुपारी वर्षा किंवा नंदनवनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
शिवसेनेला किती मंत्रिपद? कोणाची वर्णी?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीत महायुतीच्या नव्या सरकारच्या फॉर्म्युल्या संदर्भात आमदारांसोबत चर्चा करतील, अशी शक्यता आहे. तसेच याच बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदा संदर्भातही चर्चा होणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला 14 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या कोट्यात आधीच्या मंत्री मंडळातील जेष्ठ मंत्र्यांचाही सहभाग असणार आहे. तर काही माजी मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे. त्यांच्या जागी नवीन आमदारांनी मंत्री पदासाठी संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.च
सत्ता स्थापनेचा तिढा कायम
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. त्यानंतर भाजप आणि महायुतीची बैठक होणे अपेक्षित होते. या बैठकादेखील झाल्या नाहीत.
