अजितदादांना चेकमेट!
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गृहखात्यासह इतर काही महत्त्वाच्या खात्यासाठी आग्रही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थखातं मिळावं म्हणून एकनाथ शिंदे आग्रही आहेत. तर, दुसरीकडे आपल्याकडील अर्थ खाते जाऊ नये म्हणून अजित पवारही दिल्लीत तळ ठोकून आहेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदेंना चेक दिला होता. आता शिंदेंकडून अर्थ खात्याची मागणी करण्यात आल्याने अजित पवारच अडचणीत आले आहेत. खाते वाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकार स्थापनेपूर्वी महायुतीमध्ये सत्तावाटपात शह काटशहाच राजकारण सुरूच आहे.
advertisement
अर्थ खात्यावर दावा का?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह आणि नगरविकास खाते मिळावे अशी मागणी केली आहे. मात्र, या खात्यांबाबत विशेषत: गृह खात्याबाबत भाजप सकारात्मक नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्यावर दावा केला आहे. एकनाथ शिंदेंनी अर्थमंत्रालयावर दावा केल्यानंतर अजित पवार दिल्लीत आले आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत.'
सत्ता वाटपाचा तिढा कायम
मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला होता.
दिल्लीतील बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी आपली प्रकृती बरी नव्हती सांगत सत्ता वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे जाहीर केले होते.
