सातारा जिल्हा रुग्णालयात एकाच महिन्यात दोनदा मृतदेहांची अदलाबदल झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निलंबनाच्या कारवाईवरच राज्य सरकार थांबणार नसून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. करपे यांची विभागीय चौकशी देखील होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी शवविच्छेदन करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी दिले.
advertisement
सातारा सिव्हिलमध्ये मृतदेहांची अदलाबदल, चिता पेटल्यानंतर प्रकार आला उघडकीस!
साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला. मृत्यूनंतरही मृत शरीराची हेळसांड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील २६ वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील ५१ वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले आणि याच ठिकाणी घडली मोठी चूक! कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली. इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आणि मग पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांना देखील नातेवाईकांनी यावेळी जाब विचारला. यादरम्यान शवविच्छेदन करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश डॉ. युवराज करपे यांनी दिले आहेत. यामुळे काही वेळ शासकीय रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
