ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.
प्रभाग रचनेचे महत्त्वाचे टप्पे
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. 'गुगल अर्थ'च्या साहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल.
advertisement
२७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. २३ मार्च २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ पर्यंत ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.
हरकती आणि सूचनांसाठी मुदत
प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी प्रशासनाने पुरेसा वेळ दिला आहे. ७ एप्रिल रोजी प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. तर, २१ एप्रिल २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रभाग रचना २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम करतील.
४ मे २०२६ रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने, ग्रामीण भागात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
