2 ट्रॅक्टर उंबराची भाजी, 50 क्विंटल गव्हाच्या चपात्या, जालन्यात 102 वर्षांची महाप्रसादाची अनोखी परंपरा
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शिवयोगी स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी महाप्रसाद म्हणून उंबरधोड्याची भाजी, फिकं वरण आणि मंदिराच्या घंटीपर्यंत चपात्या करण्याची परंपरा आहे.
जालना : आपल्या देशात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा पाहायला मिळतात. जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथे असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वरी येथे उंबरधोड्याची भाजी करण्याची अनोखी परंपरा आहे. शिवयोगी स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी महाप्रसाद म्हणून उंबरधोड्याची भाजी, फिकं वरण आणि मंदिराच्या घंटीपर्यंत चपात्या करण्याची परंपरा आहे.
जालना जिल्ह्यात मौजपुरी येथे श्रीक्षेत्र रामेश्वरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी होऊन गेलेल्या शिवयोगी स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होते. महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी शिवयोगी स्वामी यांची पुण्यतिथी असते. मागील 101 वर्षांपासून या पुण्यतिथीच्या दिवशी या ठिकाणी उंबरधोड्याच्या भाजीचा भंडारा केला जातो.
advertisement
यंदा शिवयोगी स्वामी यांच्या जयंतीचे हे 102 वे वर्ष आहे. या भंडार्यासाठी लाकडे तोडण्यापासून ते चपात्या लाटण्यापर्यंत सर्व कामे स्वयंस्फूर्तीने केली जातात. तब्बल दोन ट्रॅक्टर उंबरधोड्याची भाजी केली जाते. तर तब्बल 50 क्विंटल गव्हाच्या चपात्या लाटल्या जातात. हे सर्व साहित्य गावकरी एकमेकांच्या घरून जमा करतात.
advertisement
रामेश्वरीत असलेल्या शिव मंदिराच्या बाजूलाच असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या घंटीपर्यंत पोळ्या लाटल्या जातात. इथपर्यंत पोळ्या केल्या की कितीही भाविक आले तरी देखील महाप्रसाद कमी पडत नाही अशी येथील नागरिकांची श्रद्धा आहे. तसेच शिवयोगी स्वामी यांच्या आज्ञेनुसार या ठिकाणी उंबरधोड्याची भाजी, फिके वरण आणि चपात्या हाच महाप्रसाद केला जातो. एकदा गावकऱ्यांनी वेगळा महाप्रसाद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र भाविकांना महाप्रसाद पुरला नाही.
advertisement
तब्बल 101 वर्षांपासून ही परंपरा चालत आली असून यंदा या भंडाऱ्याचे 102 वे वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीने आगळावेगळा महाप्रसादाचा नियोजन असलेला हा पहिलाच भंडारा म्हणावा लागेल. शिवयोगी स्वामींच्या आज्ञेनुसार अशा पद्धतीचा महाप्रसाद करण्याची इथे परंपरा आहे. ही परंपरा पुढेही अविरतपणे सुरू राहील असे मंदिर कमिटीतील सदस्य अरुण डोंगरे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 12:06 PM IST
मराठी बातम्या/जालना/
2 ट्रॅक्टर उंबराची भाजी, 50 क्विंटल गव्हाच्या चपात्या, जालन्यात 102 वर्षांची महाप्रसादाची अनोखी परंपरा






