विमानाचं इंजिन फक्त ८५ तास.., अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Rohit Pawar On Ajit Pawar Accident : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाची मालिका सुरूच असून या प्रकरणात आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले.
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाची मालिका सुरूच असून या प्रकरणात आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. विमान कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला असल्याचा दावा करत त्यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
इंधन भरण्यापासून लँडिंगपर्यंत संशय
रोहित पवार म्हणाले की, “विमानात इतके जास्त इंधन का भरले होते, हा मोठा प्रश्न आहे. बारामतीच्या प्रवासासाठी मुद्दाम अतिरिक्त इंधन भरले होते का? जर धुके जास्त होते, तर लँडिंग का करण्यात आली? ही लँडिंग मुद्दाम करण्यात आली का? असा संशय निर्माण होतो.”
ब्लॅक बॉक्सबाबत गंभीर आरोप
ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. “११००० अंश सेल्सिअस तापमानात ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. ६ हजार मीटर खोलीपर्यंत पाण्याचा प्रेशर असतानाही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. त्या ठिकाणी कागदही न जळलेले आढळले. आतापर्यंतच्या अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहिलेला आहे. मग या अपघातात तो कसा जळाला? हे मॅन्युप्युलेशन नाही ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
advertisement
नियमबाह्य उड्डाण आणि बनावट कागदपत्रांचा आरोप
“एअरलेटचे विमान चालवणाऱ्याला लेगेसी विमान चालवण्याची परवानगी नाही. मात्र संबंधित व्यक्ती दोन्ही प्रकारची विमाने चालवत होती. हे सरळसरळ नियमबाह्य आहे. कंपनी खोटी कागदपत्रे तयार करत आहे. कागद रंगवण्यापेक्षा सत्य समोर आणा,” असा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यांनी हेही नमूद केले की, अजित पवार यांनी वापरलेले विमान १० कोटी रुपयांचे होते, तर त्याचा विमा २०० कोटी रुपयांचा होता.
advertisement
पायलट आणि परदेशी व्यक्तीवर प्रश्न
रोहित पवार यांनी सांगितले की, “२०२३ मधील एका अपघातप्रकरणात विमान चालवणारा पायलट दारूमुळे दोन वेळा निलंबित झाला होता. तसेच कार्लोस नावाचा व्हेनेझुएलाचा नागरिक भारतात प्रवासी म्हणून येऊन कॉकपिटमध्ये जाऊन विमान उडवत होता. वेदर रिपोर्टसह सर्व डेटा आम्ही मागवला आहे.” असंही रोहित पवार म्हणाले?
तपास यंत्रणांवर अविश्वास
“तपास यंत्रणा नीट माहिती देत नाहीत. डीजीसीए कडून दिली जाणारी मॉडेलची माहिती आणि तारखा सुद्धा चुकीच्या आहेत. मग या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? रिपोर्टमध्ये हेराफेरी होत आहे का, हा आमचा थेट सवाल आहे,” असे ते म्हणाले.
advertisement
इंजिनची लाईफ संपत आली होती
सर्वात गंभीर आरोप करताना रोहित पवार म्हणाले, “विमानाचे इंजिन लाईफ संपत आली होती. फक्त ८५ तास अजित पवार हे झेड प्लस सुरक्षा असलेले नेते आहेत. तरीही असे खराब झालेले मशीन त्यांच्या सेवेसाठी कसे दिले गेले? इतके मोठे दुर्लक्ष कसे झाले?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विमानाचं इंजिन फक्त ८५ तास.., अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट







