महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर येत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाची 'तुतारी' शांत होणार असून, सर्व उमेदवार अजित पवार यांच्या 'घड्याळ' चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या राजकीय आखाड्यात अजित पवारांनी आपली पकड घट्ट करत शरद पवार गटाला 'घड्याळा'च्या चिन्हाखाली एकत्र आणण्यात यश मिळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आगामी निवडणुकीत 'घड्याळ' चिन्हावरच लढण्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षात तसे एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह प्रचारातून गायब होणार असल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील अनुभवानंतर, सत्तेसाठी आणि विजयासाठी दोन्ही गटांनी एकाच चिन्हाखाली येण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. पुण्यातील जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यानंतर आता एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवारांकडे सूत्रे...
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाच्या तुलनेत मोठे यश मिळवले आहे. पुण्यात २७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३७ जागा जिंकून अजित पवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. याउलट शरद पवार गटाला पुण्यात केवळ ३ जागा मिळाल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये खातेही उघडता आले नाही. या निकालांनंतर अजित पवारांनी दोन्ही गटांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून, एकप्रकारे शरद पवार गटावरही त्यांचेच नियंत्रण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
