प्राथमिक विभागाच्या आणि माध्यमिक विभागाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून संचमान्यता यू- डायस प्लस प्रणालीमध्ये मुख्याध्यापकांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे नोंदी केली जाणार आहे. मुख्याध्यापकांच्या लॉग ईनवरून यू- डायस प्लस प्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. ही माहिती संचमान्यतेसाठी विचारात घेतली जाणार आहे. माहितीचे प्रमाणीकरण आणि सत्यता पडताळण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांची आहे. नोंदी तपासणीच्या कामाला नेमके केव्हापासून सुरू होणार आहे? ही माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
advertisement
प्रत्येक केंद्रप्रमुखांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे आवश्यक आहे. यात अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (बीट), गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात येईल. मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्र प्रमुखांच्या लॉगिनला फॉरवर्ड केली आहे. यू-डायस प्लसवर विद्यार्थ्यांच्या पोर्टलला प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन दैनिक विद्यार्थ्यांची उपस्थिती, भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी आणि परीक्षा दिनांकास उपस्थित असलेले विद्यार्थी यांच्या एकूण संख्येची ते तपासणी करणार आहेत.
शिवाय, यापूर्वी शाळेला भेट दिल्यानंतर त्या दिवशीची दैनिक उपस्थिती, या सर्वांचा विचार करून केंद्रप्रमुख त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेमधून काढून टाकणार आहेत. सोबतच अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरही निलंबणाची कारवाई केली जाईल. जाणीवपूर्वक वाढवलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी पुढे पाठवविले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. वेबसाईटवर एन्ट्री झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांवर केंद्रप्रमुख पडताळणी करणार आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुन: पडताळणी करून आणि नमूद विद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहेत असे विद्यार्थी कमी करावेत. विद्यार्थ्यांची पडताळणी 15 डिसेंबरपर्यंत अंतिम करण्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
