राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका पार पडत आहेत. आता, जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांत पार पाडल्या जाणार आहेत.
advertisement
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
> पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्हा परिषदा?
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण निश्चित करताना २० जिल्हा परिषदांमध्ये आणि २११ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या केवळ आरक्षण मर्यादेचे पालन करणाऱ्या १२ जिल्हा परिषदांच्याच निवडणुका घेण्यात येणार आहेत. या यादीत सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्षांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी तयारी पूर्ण केली असून, ८ ते १० जानेवारीदरम्यान अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
> ३१ जानेवारीची डेडलाईन ओलांडणार?
उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र ३१ जानेवारीनंतरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिलेली ३१ जानेवारीची मुदत ओलांडली जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण मर्यादा ओलांडल्या प्रकरणी २१ जानेवारी रोजी निर्देश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच राज्य निवडणूक आयोग या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्याआधी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
> कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केल्यानंतर १० ते १७ जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर १८ ते २० जानेवारी अर्जाची छाननी आणि माघार घेता येईल. २१ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार असून ३० जानेवारी रोजी मतदान होईल. तर, ३१ जानेवारी रोजी मतमोजणी होण्याची शक्यता आहे.
