छत्रपती संभाजीनगर: राज्यभर गाजलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या राजन शिंदे हत्याकांडात मोठे अपडेट समोर येत आहे. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या निर्घृण खून प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, खुनाच्या घटनेवेळी अल्पवयीन असलेल्या, परंतु नंतर प्रौढ समजण्यात आलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
advertisement
केवळ 'एक वाक्य' तात्कालिक कारण ठरलेल्या या खुनाच्या घटनेत, गुन्ह्याच्या क्रूरतेमुळे आणि पूर्वनियोजित तयारीमुळे अल्पवयीन आरोपीलाही कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळाली आहे. रागाच्या भरात डॉ. शिंदे यांनी आरोपीस ‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’ असे म्हटले होते. यामुळे 'ते आपल्याला मारतील' या भीतीपोटी हे कृत्य केले होते.
अखेर आरोपीला शिक्षा
धक्कादायक म्हणजे हत्या करण्यापूर्वी मुलाने वेगवेगळ्या क्राईम वेबसिरीजवर हत्या कशी करावी याची माहिती घेतली होती. तसेच हत्या केल्यावर पुरावे कसे नष्ट करावे याची माहिती देखील इंटरनेटवरून घेतली होती. पण वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सहकाऱ्यांसह तत्परतेने सखोल तपास करत ठोस पुरावे मिळवले होते आणि अखेर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हत्येचं नेमकं कारण काय?
मृत प्राध्यापक राजन शिंदे आपल्या नात्यातील एका अल्पवयीन मुलाला नेहमीच ‘ढ’ म्हणत त्याचा पाणउतारा करायचे. प्राध्यापक शिंदे यांच्याकडून वारंवार होणारा अपमान ऐकून संबंधित मुलाच्या मनात प्राध्यापक शिंदे यांच्याबाबत प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. अगदी किरकोळ कारणातून देखील दोघांत वारंवार वाद होत होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघं एकमेकांशी बोलत देखील नव्हते. दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक राजन शिंदे आणि संबंधित मुलामध्ये पुन्हा एकदा वाद झाला. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांच्यात वाद सुरू होता. याच रागातून त्याने प्राध्यापक शिंदे यांची हत्या केली आहे. प्राध्यापक राजन शिंदे सतत अपमान करतात, म्हणून संबंधित मुलाच्या मनात शिंदे यांच्याबाबत प्रचंड राग होता. 10 ऑक्टोबर रोजी वाद झाल्यानंतर, प्राध्यापक शिंदे आपल्या घरात हॉलमध्येच झोपी गेले होते. ही संधी साधून संबंधित मुलाने राजन शिंदे यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार त्याने पहाटे तीनच्या सुमारास गाढ झोपलेल्या राजन शिंदे यांच्या डोक्यात डंबलने घाव घातला. हा वार इतका भयंकर होता, की शिंदे कसला आवाज न करता जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
