माण खटावमध्ये स्वराज्य सेनेकडून सत्यवान ओंबासे यांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळालंय. पण प्रचार करताना त्यांनी कंसात तुतारी असं लिहिलं आहे. ही बाब लक्षात येताच विरोधकांनी प्रचाराची गाडी पकडून थेट पोलीस स्टेशन गाठलं. वडूज पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार करण्यात आली.
निवडणूक आयोगातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर स्वराज्य सेनेचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
advertisement
ट्रम्पेटवरून वाद
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह मिळालं. तर काही अपक्षांना ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत आपल्याला पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. यावरून सातत्याने आरोप प्रत्यारोपही होत आहेत. आता ट्रम्पेटच्या समोर तुतारी असं लिहून प्रचार करत असल्याचं समोर आल्यानं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
