आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पतीने पत्नीवर आणि मुलीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. यात दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनीष म्हात्रे (वय 30) असं आरोपी पतीचं नाव आहे. तर रश्मी म्हात्रे असं मृतक पत्नीचं नाव आहे. यात 9 वर्षीय माही म्हात्रे या मुलीचा देखील मृत्यू झाला आहे.
advertisement
पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता. पती मनीष म्हात्रे हा अनेकदा पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जात असायचा. परंतु पत्नी नांदायला येण्यास नकार द्यायची. दरम्यान मंगळवारी म्हात्रे कुटुंबात लग्न असल्यानं पत्नी रश्मी या मुलगी माही हिच्यासह अकोल्यात सासरी आल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा मनीषने पत्नीला सासरी येण्यासाठी विचारणा केली. पण पत्नीकडून होकार मिळाला नाही. याचाच राग पतीला आला
रागात पतीने पत्नी आणि पोटची 9 वर्षीय मुलगी गाढ झोपेत असताना दोघींवर कुऱ्हाडीने वार करत त्यांना जागेवरच ठार केलं. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
