खरं तर, ज्यावेळी कोर्टाकडून कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. त्यानंतर लगेच कोकाटे यांना हृदयासंबंधित त्रास जाणवू लागला. यामुळे त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज माणिकराव कोकाटे यांची कोरोनरी अँजिओप्लास्टी टेस्ट होणार आहे. या टेस्टनंतर त्यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही? याबाबत निर्णय होणार आहे. याचा अहवाल पोलिसांनी रुग्णालयाकडून घेतला आहे.
advertisement
आता माणिकराव कोकाटेंच्या अटकेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. जोपर्यंत कोकाटे यांना डिस्चार्ज दिला जात नाही, तोपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं नाशिक पोलिसांनी सांगितलं. रात्रभर पोलीस रुग्णालयातच थांबले आहेत.
यावेळी पोलिसांनी कोकाटेंवर उपचार करत असलेल्या २ डॉक्टराचा जबाबही नोंदवला आहे. रुग्णालय प्रशासनाचा अहवाल कोकाटेंबाबतचा वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांचा जबाब हा आज न्यायालयातही सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पोलीस पुढील कार्यवाही करू शकणार आहेत.
गुरुवारी रात्री १० वाजून ४१ मिनिटांनी नाशिक पोलीस लिलावती रुग्णालयात पोहचले. त्यानंतर सव्वा बारा वाजता पोलिसांनी कोकाटेंची भेट घेतली. पोलिसांना दीड तासांहून अधिक काळ ताटकळत बसावं लागलं. माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
