जालना: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार यांनी मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी, जर मूळ ओबीसी प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्र धारक उमेदवाराचा विचार करावा अशा सूचना केल्या. त्यानंतर आता वातावरण तापले असून विरोधकांनी टीका केली आहे. दुसरीकडे मराठयांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी जीवाचे रान केले होते. त्यानंतर शरद पवारांच्या या सूचनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या अशा सूचना शरद पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी, आमदार, खासदारांना दिल्या होत्या. ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या असे निर्देश शरद पवारांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पहिला पक्ष आहे ज्याने अशी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, शरद पवारांच्या निर्णयाने आम्हाला दु:ख व्हायचं काही कारण नाही. आमचा उद्देश हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे. त्यामुळं शरद पवारांच्या निर्णयाचं आम्हाला दु:ख वाटायचं काही कारण नाही.
मूळ ओबीसी समाजात नाराजी
कुणबींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची राज्यात कार्यवाही सुरू झाल्यानंतर मराठा समाजातील अनेकांनी हे प्रमाणपत्र मिळवले. मात्र, यामुळे मूळ ओबीसी समाजात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मूळ ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, यासाठी शरद पवार गटाने मूळ ओबीसींना प्राधान्य देण्याचा व जिथे मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, तिथेच कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून जरांगेंचं आंदोलन
मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केले होते, मराठा समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटिरचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार, हैदराबाद गॅझेटियर लागू करत नोंदी सापडलेल्या, पुरावे असलेल्या कुणीबी मराठांना कुणीबी जातीचा ओबीसी दाखला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने मराठा समाज बांधवांना आता कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केले जात आहे.
