नांदेड, 8 डिसेंबर : अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जप्रकरणी सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलेल्या लेखी निवेदनानंतर स्पष्ट झालं आहे. या घटनेमध्ये 79 पोलीस आणि 50 आंदोलक जखमी झाले. सर्व माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं फडणवीस यांनी त्यांच्या लेखी निवेदनात सांगितलं. फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
'त्यांनी काय उत्तर दिलं ते बघतो, माझ्याकडे जे मंत्री आले होते, त्यांनी सरसकट गुन्हे मागे घेण्यात येतील, असं सांगितलं. समाजाच्या नजरेतून त्यांना पडायचं नसेल तर त्यांनी अगोदर पाठवलेल्या मंत्र्यांना विचारावं, मग लेखी उत्तर द्यावं. मग 5 हजार पोलीस जखमी व्हायला हवे होते का? तुम्ही दिलगिरी व्यक्त केली म्हणून आम्ही गप्प बसलो, मार कुणाला लागला हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आताही लोकांच्या डोक्यात गोळ्या आहेत, त्या लोकांना आम्ही सागर बंगल्यावर नेऊन दाखवतो. पाठीमागच्या भूमिकेवर त्यांनी कायम राहावं, अन्यथा त्यांचं भविष्य अडचणीत येईल, त्यांच्या नेत्यांना मराठे दाराला शिवू देणार नाहीत,' असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं? आयोगासमोरील सुनावणी पूर्ण, कधी येणार निर्णय?
भुजबळांना टोला
छगन भुजबळ यांचा भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले पोस्टर लावण्यात आले, त्यावरही जरांगे पाटील यांनी टोला लगावला. भुजबळ भावी मुख्यमंत्री होवोत की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होवोत, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. भुजबळ जातीयवाद पसरवत आहेत, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
अशोक चव्हाण यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला, पण आरक्षणावर चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना महागात पडेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकारमधील मंत्री आता वक्तव्य बदलत आहेत, यांना 24 नंतर कळेल, शांततेत राहिलेला मराठा काय करू शकतो हे त्यांना माहिती नाही. 24 नंतर त्यांच्या लक्षात येईल, असं जरांगे म्हणाले.
'पूर्वी मतदारसंघात येताना मला टोल लागायचा..' खासदार अमोल कोल्हेंचा रोख कुणाकडे?