सोलापूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झालाय. आज सोलापूरमध्ये जरांगेंची शांतता रॅली सुरु झाली आहे. या रॅलीतून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
'जिल्ह्यातील मराठ्यांनी राज्याला दाखवून दिले आम्ही कमी नाही, आपल्याला येड्यात काढत होते. आता कार्यक्रम झाला, काही जण बघत नसतील, त्यांच्या डोळ्यात चटणी गेली असेल. सरकारला वाटतं राज्यातील मराठे एक नाहीत, आपल्यात दुष्मन्या पेरल्यात. आपल्या अस्तित्वाला हात घालण्याचं काम यांनी केलं आहे', अशी टीका जरांगेंनी केली आहे.
advertisement
'कोकणातील एक जण भीतडकडे बघतो, चांगला होता आधी बाबा. मी त्याला कधीच म्हटलं नाही मराठवाड्यात येऊ नको. उगाच जाणून बुजून भांडण का करता? ते म्हणाले बघून घेतो. मी करडे घातले असतात, काय बघतो बाबा? आता यापुढे बोलला तर धुलाई करणार', असा इशारा जरांगे पाटलांनी राणेंना दिला आहे.
भुजबळ पुन्हा रडारवर
'भुजबळ 15 दिवसांपासून कुठे गेले माहिती नाही. भुजबळ कोणत्याही मतदारसंघात जाईल तो नेता पाडायचा. मराठ्यांचं वाटोळ करणाऱ्यांना सुट्टी नाही. आधी पाडा म्हंटलं, आता नाव घेऊन पाडा म्हणणार. छगन भुजबळ आता बोगस समितीचा अध्यक्ष आहे, बोगस आरक्षण खाणारा भुजबळ आहे', अशी टीका जरांगेंनी केली आहे.
फडणवीसांवर निशाणा
'देवेंद्र फडणवीसना का बोलतो ते सांगतो. अंतरवालीमध्ये महिलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात लोक किंचाळत होते, यांचा आक्रोश ऐकायला कुणी नव्हते. फोडलेलं डोकं आणि डोक्यात गेलेल्या गोळ्या निघत नाहीत. मोठ्या डॉक्टरकडून गोळ्या निघत नाहीत, त्यांचा जीव काय म्हणत असेल? फडणवीसांनी हल्ल्याच्या बाजूने बोललं पाहिजे, पण ते पोलिसांच्या बाजूने बोलले', असं जरांगे म्हणाले.
'दरेकरांनी फडणवीसांचं ऐकून अभियान सुरू केलं, हे अभियान नाही षडयंत्र आहे. मराठ्यांच्या जेवणात माती नका मिसळवू. सगळे चोर फडणवीसकडेच, छोटे चोर, दरोडेखोर, पाकिटमार यांच्याकडेच', असा आरोप जरांगेंनी केला आहे.
'आंबेडकर म्हणाले माझं आणि फडणवीसांचं भांडण नकली आहे, पुढे म्हणाले मी शरद पवारचा आहे. यांना मेळच लागेना मी कुणाचा आहे. माझा मालक फक्त मराठा समाज आहे, मी कुणाचा आहे याचा मेळ यांना लागणारच नाही', असा पलटवार जरांगेंनी केला आहे.