काय म्हणाले मुख्यमंत्री?
'सरकार मराठा आरक्षण देणार आहे, सरकारची कालही तीच भूमिका होती आणि आजही कायम आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार. मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. 1 लाख 40 हजार लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत, सर्व्हेचं काम जोरात सुरू आहे. कुणबी नोंदी सापडत आहेत, त्याचं प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
'मनोज जरांगे पाटील यांना आवाहन आणि विनंती केली आहे, सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार देण्याच्या मनस्थितीमध्ये काम करत आहे. कुठलंही आश्वासन न देता थेट मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सुविधा देण्याचं काम केलं आहे. मनोज जरांगेंशी सातत्याने चर्चा होत आहेत, त्या चर्चा सकारात्मक होत आहेत. मराठा समाजाला सोयी सुविधा देण्याबाबत सरकार हात आखडता घेणार नाही. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं, टिकणारं, आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता सरकार हा निर्णय घेईल', असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
'जरांगेंना आवाहन केलं आहे, सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.
जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
दरम्यान मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानावर आंदोलन करा, असा पर्याय पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मला मुंबईत यायची हौस नाही, आम्ही काही मजा करायला आलो नाही. इथे माझे मराठा बांधव थंडी वाऱ्यात बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येऊन चर्चा करावी, तातडीने तोडगा काढावा आम्ही गावाला निघून जातो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
