दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून, “बिहारमध्ये या, पटक-पटक के मारेंगे,” असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यात परप्रांतीयांविरोधात आधीच तणावाचं वातावरण असताना, या वक्तव्याने मराठी जनतेत संताप उसळला होता. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी विरोधकांकडून लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना संसद भवनाच्या लॉबीत अचानक गाठलं असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिलं.
advertisement
काँग्रेसच्या महिला खासदारांनी विचारला जाब...
खासदार निशिकांत दुबेंना घेरत काँग्रेसच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. “मराठी लोकांविरोधात मारण्याची भाषा कशी काय करू शकता? कोणाला कसा ‘आपटून’ मारणार आहात? ही काय अर्वाच्य भाषा आहे तुमची?” असा थेट सवाल दुबेंना केला. वर्षा गायकवाड यांचा संताप इतका तीव्र होता की, आजूबाजूच्या इतर राज्यांतील खासदारही क्षणभर गोंधळले. दरम्यान, “जय महाराष्ट्र”च्या जोरदार घोषणांनी लॉबी अक्षरशः दणाणून गेली. हे सगळं घडत असतानाच आसपासचे अनेक मराठी खासदारही तेथे आले आणि त्यांनीही दुबेंना जाब विचारला.
संपूर्ण प्रसंगात दुबेंना एकही स्पष्ट उत्तर देता आलं नाही. त्यांनी थोडक्यात तिथून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, महायुतीतील काही मराठी खासदार हे दृश्य पाहून खुदकन हसल्याचंही उपस्थितांनी सांगितलं.
या सगळ्या गोंधळानंतर दुबे कँटिनकडे निघाले असता, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांना थांबवून विचारणा केली की, “नेमकं घडलं तरी काय?” मात्र दुबेंनी कोणताही खुलासा न करता तडक पुढे निघून गेले.
दुबेंचा सूर मावळला...
यानंतर काही पत्रकारांनी वर्षा गायकवाड यांना थांबवून चौकशी केली असता, “हो, आम्ही त्यांना स्पष्टपणे जाब विचारला. मराठी जनतेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही,” असं त्या म्हणाल्या. हे बोलतानाच पुन्हा एकदा दुबे तिथेच आले आणि गायकवाड यांनी तात्काळ पुन्हा “जय महाराष्ट्र”च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
गोंधळलेले दुबे शेवटी हात जोडत म्हणाले, “आप तो मेरी बहन हैं…” आणि तिथून निघून गेले.
संसदेत चर्चा...
संसद भवनात थोड्याच वेळात रंगलेलं हे नाट्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. हिंदी सक्तीच्या वादात मराठी बाणा ठासून दाखवणाऱ्या प्रसंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
