बुलढाणा: मुलबाळ होत नाही म्हणून विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी अमानुष छळ केल्याची घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, 3 वर्षे या विवाहित महिलेचा अमानवीय छळ करण्यात आला. तिच्यावर अघोरी कृत्य आणि जादूटोणा सुद्धा करण्यात आला. एवढंच नाहीतर विजेचे झटके सुद्धा देण्यात आले. अखेरीस पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पतीसह 7 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाड इथं ही घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. पती मोहम्मद शहबाज मोहम्मद इक्बाल, सासरा मोहम्मद इक्बाल मोहम्मद यासीन, सासू शेबानाबी मोहम्मद इक्बाल, दिर मोहम्मद शहादात मोहम्मद इक्बाल, जाऊ सलमा परवीन मोहम्मद शाहदाब, नणंद सबा अज्जुम मोहम्मद अतिक, तक्रारदाराची नणंद अशी आरोपींची नावे आहेत. लग्नात हुंडा कमी दिला आणि मुलबाळ होत नाही त्यामुळे पती आणि त्याच्या नातेवाईकांनी अमानुष छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेचं लग्न झालं पण लग्नात हुंडा कमी दिला म्हणून सारखा छळ सुरू होता. पुढे चालून हा प्रकार आणखी वाढला. पतीकडून तिला वारंवार मारहाण होत होती. हद्द म्हणजे, मुलबाळ होत नाही म्हणून विवाहितेला जादूटोण्यासाठी बळी देण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. तिच्या बिछान्यावर अघोरी विद्येसाठी वापरण्यात येणारे लिंबू, गंडे असं साहित्य टाकलं जात होतं. 'तू मुलबाळ तर देऊ शकत नाही, मग तुझा वापर जादूटोणा साठी का करू नये?' असं सांगून तिचा छळ केला जात होता.
हा प्रकार इथंच थांबला नाही तर पतीने पीडितेला अश्लील चित्रफित दाखवून अत्याचार केले. ३ वर्ष हा छळ सोसल्यानंतर पीडित आपल्या माहेरी आली. हा सर्व अघोरी प्रकार मे २०२१ ते १० जून २०२४ दरम्यान ती सासरी असताना करण्यात आला. अखेर पीडिता माहेरी परत आल्यानंतर सगळी हकीकत घरी सांगितली. कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली. देऊळगाव राजा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम २०१९ च्या कलम ३ तसंच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
