उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेवर वक्तव्य केलं आहे. शिवाय त्यांनी सरकार भविष्यात आणत असलेल्या योजनेबद्दल ही सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर्थिक विकासाच्या प्रवाहात महिलांना आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदीसारख्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यातही 1 कोटी महिलाभगिनींना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यात भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवास सवलत, मोफत शिक्षण अशा योजनांबरोबरच लाडक्या भावांसाठीही युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पीक विमा, सोलर वीज अशा विविध योजना सुरू केल्या आहेत.
advertisement
शासनाने जिगाव प्रकल्प पूर्णत्वास नेला असून, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लाडकी बहिण योजनेमुळे ग्रामीण भागात होणाऱ्या फायद्याबद्दल देखील वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले, तसेच ग्रामीण अर्थचक्राला गती दिली आहे. या रकमेमुळे महिलाभगिनींना आत्मविश्वास मिळाला असून, छोटे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. राज्यात उद्योग- व्यवसायांचीही भरभराट होत असून, देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. बुलडाणा शहरात उभे राहिलेले महापुरूषांचे पुतळे नवीन पिढीला सातत्याने प्रेरणा देत राहतील, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप, तसेच लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित जिल्हा कॉफीटेबल बुक आणि ‘राजमाता’ बोधचिन्हाचे अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
