> काय आहे नेमके प्रकरण?
जागावाटपातील गोंधळ आणि बंडखोरांना अर्ज भरता येऊ नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारांना रात्री उशिरा पक्ष कार्यालयात बोलावून 'एबी फॉर्म' वाटले होते. मात्र, या प्रचंड गुप्ततेमुळे आणि घाईघाईत डमी उमेदवार अर्ज भरण्याची जुनी प्रथा विसरली गेली. परिणामी, चक्क ४ प्रभागांमध्ये आपले उमेदवार गमावले आहेत. यामुळे आता २२७ जागांच्या लढतीत महायुती केवळ २२३ जागांवर मैदानात असणार आहे. काही कारणास्तव किंवा उमेदवार न दिल्याने प्रभाग १४५, १६७, २११ आणि २१२ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवारच रिंगणात नसल्याचे समोर आले आहे.
advertisement
> या ४ प्रभागांत महायुतीची पाटी कोरी:
१. प्रभाग १४५ (ट्रॉम्बे-चिता कॅम्प): येथे महायुतीचा उमेदवार नसल्याने आता राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस आणि उद्धवसेना यांच्यात तिरंगी लढत होईल.
२. प्रभाग १६७ (कुर्ला पश्चिम): येथे काँग्रेस, उद्धवसेना आणि समाजवादी पक्ष आपसात भिडणार आहेत.
३. प्रभाग २११: येथे राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मैदानात आहेत.
४. प्रभाग २१२ (दक्षिण मुंबई): येथे काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेना यांच्यात सामना रंगणार आहे.
> डमी उमेदवार नसल्याचा फटका?
सहसा निवडणूक लढताना अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर पक्षाचा डमी उमेदवार कामाला येतो. मात्र, यावेळी बंडखोरांच्या भीतीपोटी डमी अर्जांकडे दुर्लक्ष झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दक्षिण मुंबई आणि कुर्ल्यासारख्या महत्त्वाच्या भागात उमेदवार नसणे, हा महायुतीसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
