मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका घेण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबई महापालिका निवडणुकीत दबदबा कायम ठेवण्याचं आव्हान आहे. तर, मुंबई महापालिकेत ठाकरेंना पराभवाचा धक्का देत त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लावण्याचा प्रयत्न भाजप-शिंदे गटाकडून होणार आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग 6 ऑक्टोबर रोजी प्रभागांची अंतिम रचना जाहीर करणार असून, या निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर 10 ते 12 सप्टेंबरदरम्यान नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर हरकतदार नागरिकांनी आपली मते मांडली.
या प्रक्रियेत एकूण 494 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. पहिल्या दिवशी (10 सप्टेंबर) 189 हरकतींवर, दुसऱ्या दिवशी (11 सप्टेंबर) 277 हरकतींवर तर तिसऱ्या दिवशी (12 सप्टेंबर) 28 हरकतींवर सुनावणी झाली. तीन दिवसांत एकूण 424 हरकतींची सुनावणी पूर्ण झाली.
आता सर्व सुनावण्या आणि सादर केलेल्या सूचनांचा विचार करून राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना निश्चित करणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी ही रचना जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला प्रत्यक्ष गती मिळणार आहे.
प्रभाग रचनेनंतर काय?
प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात येईल. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच्या काही दिवसांतच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार. मुंबई महापालिकेची निवडणूक ही जानेवारी महिन्यात होण्याचा अंदाज आहे.