मध्य पूर्वेमध्ये पेटलेल्या अमेरिका-इराण युद्धाचा फटका आता मुंबईतील एका कुटुंबाला बसला आहे. आखातामध्ये अमेरिकन मालकीच्या 'सेफसी विष्णू' या कच्च्या तेलाच्या टँकरवर इराणने केलेल्या अंडरवॉटर ड्रोन हल्ल्यात भारतीय मरीन इंजिनिअर देवनंदन प्रसाद सिंह यांचा मृत्यू झाला आहे. देवनंदन सिंह हे मुंबईच्या कांदिवली (पूर्व) भागातील रहिवासी होते. काही दिवसांपूर्वी इराणने ओमानमध्ये असलेल्या जहाजाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यातही कांदिवलीमधील दीक्षित सोलंकी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
advertisement
नेमकी घटना काय?
दोन दिवसांपूर्वी इराकच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू टँकरवर इराणने समन्वित ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे जहाजावर मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. देवनंदन सिंह हे या जहाजावर 'ॲडिशनल चीफ इंजिनिअर' म्हणून कार्यरत होते. स्फोटात ते गंभीररीत्या भाजले गेले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिलासादायक बाब म्हणजे, या जळत्या जहाजावरून इतर १५ भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
बिहारवरून मुंबईत झाले होते स्थायिक...
५० वर्षांचे देवनंदन सिंह २०१९ मध्ये आपल्या कुटुंबासह बिहारहून मुंबईत स्थायिक झाले होते. कांदिवलीत ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. कार्गो जहाजांवर तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे सिंह आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार होते. त्यांच्या निधनामुळे कांदिवली परिसरात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
इराकजवळ झाला होता हल्ला...
इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) पर्शियन गल्फमध्ये दोन जहाजांवर अंडरवॉटर ड्रोनने हल्ला केल्याचा दावा केला होता. रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्याचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यात जहाजावर आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. हे जहाज अमेरिकन मालकीचे असल्याने इराणने त्याला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.
