वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी-हायस्पीड ट्रेन असून, ती 160 किमी/तास वेगाने धावते. यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास कोच उपलब्ध आहेत, जे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह आरामदायक प्रवास देतात. सीसीटीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे आणि व्हॅक्यूम टॉयलेट्स यांसारख्या सुविधांमुळे ही ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. आता नांदेडकरांना देखील या गाडीची सुविधा मिळणार आहे.
advertisement
मुंबई ते नांदडेपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 18 चेअरकार आणि 2 एक्झिक्युटिव्ह असे एकूण 20 डबे असतील. या गाडीत 1 हजार 440 आसनांची व्यवस्था आहे. मंगळवारी लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारपासून ही रेल्वेगाडी दररोज सकाळी 5 वाजता एच.एस. नांदेड रेल्वे स्टेशनवरून निघेल आणि दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीमुळे नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास देखील सव्वातीन तासांत होईल, तर नाशिक रोड येथे जाण्यासाठी फक्त सहा तास लागतील.
सध्या महाराष्ट्रासह देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचं अतिशय वेगाने विस्तारीकरण केलं जात आहे. मुंबई-नांदेड वंदे भारतच्या रुपात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत नेण्यात आल्याने रेक आणि प्राथमिक देखभाल व्यवस्था देखील आता नांदेड येथे हलवण्यात आली आहे.