पंढरपूर: मागील आठवड्यात मुंबईजवळील पालघरमध्ये भूकंप आणि जमिनीखालून आवाज आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता विठुरायाच्या पंढरपुरात सकाळपासून दोन वेळा गूढ आवाजाने खळबळ उडाली आहे. जमिनीखालून गुढ आवाजाने पंढरपूरनगरी हादरली आहे. मोठ्या आवाजामुळे काही ठिकाणी घराच्या काचाही फुटल्यात. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढपूरमध्ये आज सोमवारी सकाळपासून दोन वेळा भुगर्भातून मोठा आवाज आला. सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पहिली घटना घडली. अचानक भूगर्भातून मोठा आवाज झाला. त्यामुळे हा आवाज कुठून आला, भूकंप तर नाही ना, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पंढरपुरकरांनी सर्वत्र शोध घेत असला कुठेही काही विपरित घडलं नसल्याचं स्पष्ट झालं. कुठे कंपनी बॉयलरचा स्फोट किंवा अपघात झाला, असा अंदाज बांधला जात होता, पण कुठेही अशी घटना घडली नाही. त्यामुळे पंढरपूरमध्ये गुढ आवाजामुळे खळबळ उडाली.
advertisement
सकाळच्या धक्क्यातून लोक सावरत नाही तेच दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी पुन्हा एकदा गूढ आवाज ऐकू आला. सकाळच्या पेक्षा दुपारी या आवाजाची तीव्रता जास्त होती. मोठ्या आवाजामुळे घरांच्या काचाही कडाडल्या. आता हा आवाज कुठून आला असावा त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. गुढ आवाज भूगर्भातून आला आहे की भूकंप सदृश्य की आणखी काय आहे, याबद्दल पंढरपुरात चर्चा रंगली आहे.
असा गुढ आवाज का येतो?
याआधीही असे आवाज आल्याच्या घटना घडल्याची नोंद आहे. मुळात पंढरपूर हे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे. बऱ्याच जमिनीखाली असलेल्या खडकांच्या थरामध्ये हालचाली होतात किंवा खडकांवर दबाव निर्माण झाला की, त्यामुळे अचानक दबाव निर्माण होतो, त्यामुळे जमिनीखालून आवाज येतो. हे धक्के सौम्य प्रमाणात असतात त्यामुळे भूकंप मोजणाऱ्या रिश्टेर स्केलवर नोंदवले जात नाही. पण हा आवाज लोकांना स्पष्ट ऐकू येतो.
असंही म्हटलं जातं की, पावसाळ्यात पाणी जमिनीखाली भेगांमधून खोलवर जातं तेव्हा तापलेल्या किंवा खोलवर असलेल्या खडकांच्या संपर्कात आलं तर वाफ तयार होऊन हवेचा दाब निर्माण होतो. त्यामुळे खडकांमध्ये आवाज निर्माण होतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तसंच, जमिनीखाली नैसर्गिक पोकळ्या असतात, त्यामुळेही असा हवेचा दाब निर्माण होतो. जेव्हा ही हवा दबाव निर्माण करून वरच्या बाजूला येते तेव्हा असा आवाज ऐकू येतो.
