भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : निवडणुकीच्या राजकारणात सयंम आणि योग्य वेळ महत्त्वाची असल्याचे म्हणतात. काही वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत अवघ्या ३४ मतांच्या पराभवानंतर आता राजकीय कारकिर्द संपली असल्याची लोक चर्चा करू लागले. मात्र, ९ वर्षांनी पठ्ठ्याने झोकात कमबॅक करत विरोधकांना धक्का दिला आहे. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी घटना कोकणात घडली आहे.
advertisement
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणीच कायमचा मित्र नसतो, असं म्हटलं जातं. पण काही पराभव काळजाला असे टोचतात की, त्याचा वचपा काढल्याशिवाय राजकारण्याला शांत झोप लागत नाही. कणकवली नगरपालिकेच्या निकालाने याचाच प्रत्यय दिला. २०१७ साली केवळ ३४ मतांनी हुलकावणी दिलेल्या विजयाला संदेश पारकर यांनी २०२५ मध्ये १४५ मतांच्या फरकाने खेचून आणलं आणि एक नवा इतिहास रचला.
काय आहे पराभवाचा इतिहास?
तो '३४' चा आकडा आणि राजकीय वनवास.२०१७ सालची ती निवडणूक कणकवलीकरांच्या आजही स्मरणात आहे. त्यावेळी भाजपच्या चिन्हावर लढणारे संदेश पारकर आणि स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. दुर्दैवाने, पारकर यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांच्याकडून झालेल्या विधानसभेतील पराभवामुळे पारकर यांची राजकीय कारकीर्द संपली, अशी चर्चा विरोधकांनी सुरू केली होती. पण अनपेक्षित समीकरणं आणि निलेश राणेंची साथ मिळाली. राजकारणाने पुन्हा एकदा कूस बदलली. ज्या राणे कुटुंबाशी पारकरांचा संघर्ष होता, त्याच कुटुंबातील निलेश राणे यांच्या राजकीय पाठबळावर पारकर यांनी 'शहर विकास आघाडी'च्या माध्यमातून भाजपला थेट आव्हान दिले. एकेकाळचे मित्र आणि नंतरचे कट्टर प्रतिस्पर्धी समीर नलावडे यांच्यासमोर पारकर पुन्हा एकदा दंड थोपटून उभे ठाकले.
पराभवाची सव्याज परतफेड...
संदेश पारकरांनी पराभवाचा वचपा काढत सव्याज परतफेड केली. काल जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा पारकर यांनी समीर नलावडे यांचा १४५ मतांनी पराभव केल्याचे स्पष्ट झाले. २०१७ मध्ये झालेल्या ३४ मतांच्या पराभवाचा वचपा त्यांनी केवळ विजयाने नाही, तर मताधिक्य वाढवून 'सहव्याज' काढला. "हा विजय केवळ माझा नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कणकवलीकराचा आहे. २०१७ ची ती जखम आजही ताजी होती, पण आज जनतेने दिलेल्या कौलामुळे त्या पराभवाचे शल्य पुसले गेले असल्याचे पारकरांनी सांगितले.
पारकरांच्या विजयाची घोषणा होताच कणकवली शहरात त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली. फटाक्यांच्या आतषबाजीत पारकर समर्थकांनी शहर दणाणून सोडले. माध्यमांशी बोलताना संदेश पारकर यांना आपले अश्रू अनावर झाले. अनेक वर्षांचा संघर्ष आणि राजकीय वनवास संपल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. या भ्रष्ट टोळी विरुद्ध कणकवलीकरांनी दिलेला हा निकाल आहे आणि यापुढे कणकवलीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदेश पारकर यांनी स्पष्ट केले.
संदेश पारकरांचा संघर्षमय राजकीय इतिहास..
संदेश पारकर हे 2003 मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष झाले. तब्बल पंधरा वर्षे संदेश पारकर यांची या नगरपंचायतीवर एक हाती सत्ता राहिली. मात्र 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत संदेश पारकर यांना आसमान दाखवत आमदार नितेश राणेनी तेव्हा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत समीर नलावडे यांना विजयी केले होते. परंतु यानंतर नऊ वर्ष संदेश पारकर हे राजकारणातून पूर्णपणे विजनवासात गेले होते. परंतु न डगमगता संदेश पारकर यांनी हा विजय मिळवत नितेश राणे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिला आहे.
2003 मध्ये शिवसेनेचे नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संदेश पारकर यांच्यासाठी कणकवलीत सभा घेतली होती. त्यावेळी अख्ख मंत्रिमंडळ जरी आलं तरी संदेश पारकर यांचा कोणी पराभव थांबू शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य एका सभेमध्ये नारायण राणे यांनी केलं होतं. परंतु त्यावेळी संदेश पारकऱांनी 17-0 करत तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या शिवसेनेला आस्मान दाखवलेलं होतं. त्यावेळी संदेश पारकर हे राष्ट्रवादीमध्ये होते. यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष बनलेले संदेश पारकर हे अख्ख्या महाराष्ट्रात नारायण राणेंचे जाईंटकिलर म्हणून ओळखले गेले होते. या सगळ्यात संदेश पारकर यांचे अतिशय कट्टर समर्थक असलेले समीर नलावडे हे काही काळात संदेश पारकर यांच्याकडून फारकत घेत नारायण राणे यांना जाऊन मिळाले.
एकीकडे संदेश पारकर आणि समीर नलावडे दोन कट्टर मैत्राती दरी वाढत गेली आणि दोघेही एकमेकांचे राजकारणातील पक्के वैरी बनले. नऊ वर्ष पराभव पचवत संदेश पारकर यांनी कणकवलीतील मोट हळूहळू बांधायला घेतली होती आणि हीच मोट सिंधुदुर्गातील युती विस्कटल्यानंतर पुन्हा बांधली. निलेश राणेंना भावनिक साध घालत त्याना भाजप विरुद्ध मोट बांधण्याचं भावनिक आव्हान केलं आणि निलेश राणेंनी हे भावनिक आव्हान उचललं आणि संदेश पारकरांना साथ दिली. समीर नलावडे यांच्या कच्चा बाजूंचा पक्का अभ्यास करत संदेश पारकर यांनी कणकवली पिंजून काढली आणि अवघ्या दहा दिवसात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवले. याचाच फायदा घेत संदेश पारकर काल 145 मतांनी विजयी झाले. राजकारणात कोणी कधी संपत नाही याचा हा प्रत्यय देणारा विजय होता. भविष्यात संदेश पारकर कणकवलीची धुरा कशी सांभाळतात. यावरच त्यांच्या राजकीय भवितव्याची गणित अवलंबून असणार आहेत
