तारेवरची कसरत, पण चेहऱ्यावर हसू
निवडणूक जाहीर झाली आणि त्याच काळात पायल यांना मातृत्वाचा आनंद मिळाला. पण पक्षाने दिलेली जबाबदारी आणि लोकांसाठी काम करण्याची इच्छा यामुळे त्यांनी घरात बसून राहणं पसंत केलं नाही. सध्या नागपूरच्या उन्हात आणि प्रचाराच्या धबडग्यात पायल कधी बाळाला गाडीत ठेवतात, कधी घरी सोडून बैठका उरकतात, तर कधी बाळ कडेवर असतानाच मतदारांच्या गाठीभेटी घेतात.
advertisement
"भाजप स्त्रियांना कमकुवत मानत नाही"
आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना पायल कुंदेलवार भावूक होतात. त्या म्हणतात, "मला मातृत्वाचा आनंद मिळाला आहेच, पण समाजाने आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलाय, तो सार्थ ठरवणं हे माझं कर्तव्य आहे. भाजप हा असा पक्ष आहे जो स्त्रियांना कधीच कमकुवत मानत नाही. मी नऊ महिने गरोदर असतानाही काम केलंय आणि आता माझी मुलगी शर्वरीही माझ्या या प्रवासातली सोबती आहे."
बाळाची काळजी आणि कुटुंबाची साथ
एक महिन्याच्या बाळाला बाहेर नेणं हे जिकिरीचं असतं. यावर बोलताना त्या सांगतात की, "जेव्हा जास्त वेळ बाहेर फिरायचं असतं, तेव्हा मी तिला कारमध्ये सोबत नेते, जेणेकरून ती तिथे शांत झोपू शकेल. या कसरतीत माझे पती, आई आणि सासूबाई माझी मोठी ताकद आहेत. मी जेव्हा जनसेवेसाठी बाहेर असते, तेव्हा ते शर्वरीला जिवापाड जपतात."
प्रचारातला 'नवा चेहरा' चर्चेत
प्रभाग ३० मधील नागरिकही पायल कुंदेलवार यांच्या या जिद्दीचं कौतुक करत आहेत. एका हातात 'राजकारण' आणि दुसऱ्या हातात 'पाळणा' अशा अनोख्या स्वरूपात त्यांचा प्रचार सुरू आहे. आता नागपूरची जनता या कर्तबगार मातेच्या पदरात विजयाचं दान टाकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
