सिलेंडन हा रामटेक येथील दाहोदा येथील जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. आज त्याचा बारावीचा पेपर असल्याने तो आपल्या दुचाकीने एकटाच परीक्षा केंद्राच्या दिशेने निघाला होता. खापा-पारशिवणी मार्गावरील खैरी फाट्याजवळ तो पोहोचला असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव स्कूल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सिलेंडनला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
ज्या हातात पेन आणि पेपर असायला हवा होता, तिथे रक्ताचा सडा पडलेला पाहून प्रत्यक्षदर्शींचेही डोळे पाणावले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सिलेंडन पेपरला येणार म्हणून त्याचे मित्र त्याची वाट पाहत होते, मात्र त्याच्या अपघाताची बातमी पोहोचताच सर्वांना मोठा धक्का बसला.
एका हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयात दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, स्कूल बस चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
