शहरातील सुमारे 550 कोंडीप्रवण ठिकाणांची ओळख पटवून त्यांचे सूक्ष्म विभाग (सेगमेंट) तयार करण्यात आले आहेत. एकूण एक हजारहून अधिक सेगमेंट मॅप करून त्या-त्या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग, कोंडीची वारंवारता आणि कारणांचा अभ्यास करण्यात येत आहे. सॉफ्टवेअर प्रत्येक विभागातील वाहनांचा सरासरी वेग सातत्याने मोजते. Google Maps वरील लाल आणि गडद लाल रंगांच्या संकेतांच्या आधारे कोंडीची तीव्रता विश्लेषित केली जाते. वाहनांचा वेग ठरावीक मर्यादेपेक्षा कमी झाल्यास नियंत्रण कक्षाला आणि संबंधित वाहतूक पोलिसांना त्यांच्या मोबाइलवर तत्काळ अलर्ट पाठवला जातो.
advertisement
APMC Market: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, आल्याचे भाव पुन्हा तेजीत, डाळिंबाला आज काय मिळाला दर?
अलर्ट मिळाल्यानंतर 5 ते 15 मिनिटांत जवळील वाहतूक कर्मचारी घटनास्थळी पोहोचतील, अशी कार्यपद्धती आखण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोलिंग पथके तत्काळ रवाना केली जातील. तसेच वायरलेस सेट किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन जाम किंवा स्लो-डाउन दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत शहरातील सुमारे 300 सिग्नल यंत्रणा एआय-आधारित रिअल टाइम सिंक्रोनायझेशनद्वारे नियंत्रित केल्या जाणार आहेत. कॅमेरे, रडार आणि कंट्रोलरच्या सहाय्याने सिग्नलची वेळ वाहतुकीच्या घनतेनुसार आपोआप बदलली जाईल. त्यामुळे वाहनांचा अनावश्यक थांबा कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
या सॉफ्टवेअरच्या विकासासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. तांत्रिक सहकार्याकरिता कल आणि लेफ्टटूर्न इंडिया यांच्या सहकार्याने हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
ट्रॅफिकक्युअर प्रणाली गुगलकडे उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक (हिस्टॉरिकल) डेटाचे विश्लेषण करून रिअल टाइम परिस्थितीशी त्याची सांगड घालते. त्यामुळे केवळ सध्याची कोंडी नव्हे, तर संभाव्य स्लो-डाउन कुठे होऊ शकतो याचाही अंदाज प्रणाली देऊ शकते. यापूर्वी गूगल मॅप्सच्या माध्यमातून केवळ निरीक्षण केले जात होते. मात्र आता अचूक ठिकाण, कारण आणि संभाव्य परिणाम याबाबत माहिती मिळणार असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सॉफ्टवेअरमुळे कोंडीचे मूळ कारण जसे की अपघात, बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यावरील अडथळे किंवा सिग्नलमधील तांत्रिक बिघाड त्वरीत ओळखता येईल. त्यावर तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल.
पुण्यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात हा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो देशातील इतर शहरांसाठीही आदर्श मॉडेल ठरू शकतो. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुण्यासाठी ट्रॅफिकक्युअर ही प्रणाली वाहतूक व्यवस्थापनात नवे पर्व ठरू शकते.





