Success Story : मराठी उद्योजकाची कमाल, थेट जपानची IT कंपनी घेतली विकत; कोण आहेत पुणेकर सुनील कुलकर्णी?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या व्यवहारामुळे फिडेलच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला नवी चालना मिळाली आहे. मूळचे पुण्याचे असलेले सुनील कुलकर्णी यांनी ही कामगिरी केली आहे.
पुणे : पुण्यातील मराठी उद्योजकांनी जागतिक पातळीवर यशाची नवी नोंद केली आहे. Fidel Softech Limited या पुणेस्थित आयटी कंपनीने जपानमधील आयटी सेवा क्षेत्रातील अनुभवी कंपनी IM Corporation मधील बहुसंख्य हिस्सा संपादन केला आहे. सुमारे 8 दशलक्ष अमेरिकी डॉलर (अंदाजे 75 कोटी रुपये) किमतीच्या या व्यवहारामुळे फिडेलच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला नवी चालना मिळाली आहे. मूळचे पुण्याचे असलेले सुनील कुलकर्णी यांनी ही कामगिरी केली आहे.
मूळचे पुण्याचे असलेले सुनील कुलकर्णी यांनी 1993 साली रानडे इन्स्टिट्यूटमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. जपानी भाषा शिकून 1997 साली त्यांना जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2001 पर्यंत जपानमध्ये कार्यानुभव घेतल्यानंतर त्यांनी 2004 साली पुण्यात फिडेल सॉफ्टटेकची स्थापना केली.
जपानमधील आयटी कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या आयएम कॉर्पोरेशनच्या संपादनामुळे फिडेलची जपानमधील उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे. या संपादनानंतर जपानमधील एकत्रित टीम 200 हून अधिक व्यावसायिकांपर्यंत पोहोचली असून, फिडेल समूहाची जागतिक कर्मचारी संख्या 500 हून अधिक झाली आहे. भारत-उत्पत्तीच्या SME तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये स्थानिक उपस्थितीसह जपानमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये फिडेलचे स्थान अधिक बळकट झाले आहे.
advertisement
फिडेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी सांगितले की, आयएम कॉर्पोरेशनचे जपानी बाजारपेठेवरील सखोल ज्ञान आणि फिडेलची आयटी व AI-आधारित सेवांतील ताकद यांची सांगड ग्राहकांसाठी अधिक मूल्यनिर्मिती करणारे व्यासपीठ उभारेल. या भागीदारीमुळे AI-सक्षम एंटरप्राइझ सेवा, एंटरप्राइझ सोल्यूशन अंमलबजावणी, द्विभाषिक सल्लागार सेवा, व्यवस्थापित सेवा आणि भाषा स्थानिकीकरण सेवा अधिक सक्षमपणे देता येणार आहेत.
advertisement
आयएम कॉर्पोरेशनची स्थानिक प्रकल्प व्यवस्थापन आणि फंक्शनल कन्सल्टिंग क्षमता आणि फिडेलची जागतिक तंत्रज्ञान, AI आणि डिजिटल अभियांत्रिकी कौशल्ये यांचा समन्वय साधून ग्राहकांना जलद अंमलबजावणी आणि उच्च दर्जाच्या सेवा देण्यावर भर राहणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय डिलिव्हरी क्षमतेचा विस्तार, प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये उपस्थिती मजबूत करणे आणि पुढील पिढीतील AI-आधारित तंत्रज्ञान सेवांमध्ये गुंतवणूक वाढवणे ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
advertisement
भारत–जपान SME सहकार्याची ही यशस्वी कहाणी मानली जात असून, सांस्कृतिक सुसंगती आणि दीर्घकालीन विश्वासाच्या आधारे जागतिक तंत्रज्ञान व्यासपीठ उभारण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. विशेषतः जपानी भाषा शिकणाऱ्या भारतीय तरुणांसाठी या माध्यमातून मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 6:27 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : मराठी उद्योजकाची कमाल, थेट जपानची IT कंपनी घेतली विकत; कोण आहेत पुणेकर सुनील कुलकर्णी?





